१० डिसेंबरपर्यंत राबविणार ‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ मोहीम; सार्वजनिक, शालेय आणि घरगुती शौचालयांची होणार तपासणी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक तसेच शाळा व अंगणवाड्यांमधील शौचालयांची स्वच्छता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुधारण्याबरोबरच महिलांना, विद्यार्थिनींना आणि दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्वक स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून १० डिसेंबरपर्यंत ‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ हे अभियान राबविले जाणार असून, या कालावधीत जिल्ह्यातील सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. यंदाच्या जागतिक शौचालय दिनाची संकल्पना ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ (Safe Toilets, Equal Futures) अशी आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी ही माहिती दिली. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १९ नोव्हेंबरला जिल्हा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर शुभारंभ होणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यामध्ये पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, आवश्यक साहित्य, मलमूत्र व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेची तपासणी होईल. आवश्यकतेनुसार दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामेही केली जाणार आहेत.
घरगुती शौचालयांचेही अद्ययावतीकरण
गावातील वैयक्तिक घरगुती शौचालयांची स्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. एक खड्डा शौचालयांचे दोन खड्ड्यांच्या शौचालयांमध्ये रूपांतर करण्यासह आवश्यकतेनुसार सेप्टिक टँक व्यवस्थेचे अद्ययावतीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. मैला गाळ व्यवस्थापनाच्या (FSM) नियमांचे पालन करून यांत्रिक पद्धतीने गाळ उपसण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
शाळा, अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता परीक्षण
शाळा व अंगणवाडी केंद्रांतील शौचालयांची तपासणी करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. साबणाने हात धुण्याच्या सवयींबाबत जनजागृती केली जाणार असून, शालेय स्वच्छता परीक्षण (School Sanitation Audit) आयोजित केले जाईल. विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमांमधील सहभाग वाढविण्यासोबतच विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शौचालयांचा सहज वापर करता यावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
उत्कृष्ट शौचालयांना मिळणार गौरव
अभियानांतर्गत सार्वजनिक, सामुदायिक, संस्थात्मक आणि वैयक्तिक घरगुती शौचालयांसाठी उत्कृष्ट शौचालय स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने उत्कृष्ट सार्वजनिक व संस्थात्मक शौचालयांसह वैयक्तिक घरगुती शौचालयांची निवड करायची आहे. त्यानंतर पंचायत समिती स्तरावर उत्कृष्ट शौचालयांची निवड करून जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर केले जातील. अभियानाच्या सांगता कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शौचालयांचा आणि संबंधित ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.
स्वच्छता ही केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांचे आरोग्य, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानात सक्रिय सहभाग घेऊन सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, नियमित देखभाल आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करावा. नागरिकांनीही स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.












