शिव सूर्या मर्दानी आखाड्याचे संस्थापक प्रवीण पाटील यांचा सन्मान; आठ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर मुलांचे प्रात्यक्षिक
तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात दर सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या आरतीसोबतच डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या प्रबोधनातून उपस्थितांना वैचारिक मार्गदर्शन मिळत असते. या साप्ताहिक उपक्रमात यावेळी शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांची विशेष भर पडली. शिव सूर्या मर्दानी आखाड्याचे संस्थापक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेरे व पंचक्रोशीतील मुलांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
अवघ्या आठ दिवसांच्या कठोर प्रशिक्षणातून प्रवीण पाटील यांनी मुलांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी, दांडपट्टा यांसह विविध पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप प्रशिक्षक प्रवीण पाटील आणि प्रशिक्षणार्थी मुलांच्या विशेष सादरीकरणाने करण्यात आला. मुलांनी आत्मविश्वासाने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांतून शिवकालीन शौर्यपरंपरेची झलक अनुभवायला मिळाली. अल्पावधीत मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांची चिकाटी आणि समर्पण यांचे उपस्थितांनी कौतुक केले.
आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या विश्वात रमलेल्या नव्या पिढीला आपल्या पारंपरिक युद्धकला आणि मर्दानी खेळांची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत उच्च पदावरील नोकरीचा मार्ग सोडून मर्दानी खेळांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत असलेले प्रवीण पाटील यांचे योगदान प्रेरणादायी आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना शैक्षणिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनविणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांना शारीरिकदृष्ट्याही सक्षम, सुदृढ आणि चपळ बनविणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांचा मैदानी खेळांशी संपर्क कमी होत असताना त्यांच्यामध्ये शारीरिक क्षमता, प्रसंगावधान, धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणातून या गुणांचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्ती आणि पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी असे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतात.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे म्हणजे केवळ इतिहास सांगणे नव्हे, तर मुलांमध्ये शिस्त, धैर्य, आत्मविश्वास, जिद्द आणि स्वाभिमानाचे संस्कार रुजविणे होय. इतिहास केवळ पुस्तकांतून जिवंत राहत नाही, तर तो कृतीतून आणि परंपरेतून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा लागतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता हा वारसा जपण्यासाठी मेहनत घेणारे गुरुवर्य प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या उपक्रमासाठी तळेरे गावातील मानकरी मंडळी, माजी सभापती दिलीप तळेकर, शशांक तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. विशेषतः कोणत्याही गोष्टीचे श्रेय न घेता पडद्यामागे राहून उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान देणारे निलेश तळेकर यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शिव सूर्या मर्दानी आखाड्याचे संस्थापक प्रवीण पाटील यांनी तळेरे व पंचक्रोशीतील मुलांना दिलेल्या मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणाबद्दल उपस्थित मानकरी मंडळी व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तलवार हातात घेण्यापेक्षा मनात शौर्य, स्वाभिमान आणि शिस्त रुजविणे अधिक महत्त्वाचे आहे. श्री गांगेश्वर मंदिरातील या उपक्रमातून मर्दानी खेळांच्या माध्यमातून शिवशौर्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्यात आला.












