बालस्नेही पाडलोस गावाला दिली भेट, ओम गणेश बालसभेच्या उपक्रमांचा घेतला आढावा
बांदा (मंगल कामत) : ज्या ठिकाणी क्लास वन अधिकारी घडवले जातात त्या ठिकाणी ओम गणेश बालसभेची अध्यक्ष जाणार आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाडलोस गावाचे नाव जाणार आहे. संशोधन क्षेत्रातील अधिकारी बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षात उतरणे गरजेचे आहे. बौद्धिक संपदेचा उपयोग स्पर्धा परीक्षांसाठी करा असे प्रतिपादन, महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगच्या अधिकारी मिलन देवेंद्र जंगम यांनी केले.
पाडलोस ग्रामपंचायत येथे बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी पाडलोस बालस्नेही ग्रामपंचायत व ओम गणेश बालसभेला जंगम यांनी भेट दिली. यावेळी बालसभा अध्यक्ष सानिका गावडे, कोषाध्यक्ष साईश नाईक, सचिव गौतमी केणी, सहसचिव दिशा पाडलोसकर, सरपंच सलोनी पेडणेकर, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उदय मालवणकर, गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या छाया घाडीगावकर, विस्तार अधिकारी वैभव सावंत, जिल्हा परिषद बाल विकास अधिकारी निधी देशपांडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या क्षेत्रीय कार्यकर्त्या अपेक्षा दंतार, पर्यवेक्षिका ममता देसाई, उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक स्वाती रेडकर, बीआरपी प्राची राऊळ, प्रभाग समन्वयक अनुप देऊलकर, एकता प्रभागसंघ मळेवाडचे पदाधिकारी, स्वामीसमर्थ ग्रामसंघ पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, सर्व बचत गट महिला, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विशेष अधिकारी बनलेल्या मुलांचे जंगम यांनी कौतुक केले. इतर मान्यवरांनीही मुलांना मार्गदर्शन केले. नवचेतना बाल मेळावा अंतर्गत अंगणवाडी सेविकांनी विविध स्टॉल लावले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी केले. उपसरपंच राजेश शेटकर यांनी आभार मानले.
मालवणी भाषा अतिशय प्रेमळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी भाषा अतिशय गोड आणि प्रेमळ आहे. या भाषेमुळे वेगळेपण निर्माण होत, असे वाटते की आपल्या घरातील माणूस भेटला. त्यामुळे मला येईल तशी मी मालवणी भाषा बोलते असे मिलन जंगम यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून शारीरिक विकासाकडे लक्ष द्यावा. सिंधुदुर्गातील मुलांनी एमपीएससी, यूपीएससीकडे वळावे. संशोधन क्षेत्रातील अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परिक्षात यश मिळवले पाहिजे. पाडलोस गावातील मुलांमधून एक तरी क्लासवन अधिकारी बनावा अशी अपेक्षा मिलन जंगम यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने घेतली बालसभेची दखल
ओम गणेश बालसभेने जे उपक्रम राबवले ते कौस्तुकास्पद आहेत. वृक्षारोपण, वनराई बंधारा, स्वच्छता मोहीम, एसटीची समस्या मार्गी लावणे आदी उपक्रमांची प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यामुळे भविष्यात आपणाकडून काही सहकार्य पाहिजे असल्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही मिलन जंगम यांनी दिली. कोकणातून पुढे येणाऱ्या मुलांनी घाबरण्याची गरज नाही आपण सदैव तुमच्या सोबत असणार असे सांगत ओम गणेश बालसभेचलचे त्यांनी कौतुक केले.












