वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील आरोग्य सुविधांशी संबंधित विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रिक्त पदे भरणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची अंमलबजावणी करणे, प्रतिनियुक्ती रद्द करणे, आशा स्वयंसेविकांची स्वतंत्र पदे मंजूर करणे तसेच नवीन उपकेंद्रांच्या इमारती बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना नियमित आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून, आरोग्यविषयक योजनांच्या अंमलबजावणीवर तसेच जनजागृतीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य सेवक रमेश खेम राठोड यांची कुसूर उपकेंद्रात प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. मात्र, बदलीचे आदेश होऊनही त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. कुसूर येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात नियमित आरोग्य सेविका व कंत्राटी आरोग्य सेविका ही दोन पदे रिक्त असल्याने राठोड यांची बदली तातडीने कार्यमुक्त करून कुसूर येथे आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच तिथवली आणि दिगशी या दोन गावांसाठी एकच आशा स्वयंसेविका पद मंजूर आहे. गावांमधील अंतर आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दिगशी गावासाठी स्वतंत्र आशा स्वयंसेविका पद मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आखवणे उपकेंद्रांतर्गत आखवणे, नागपावाडी, भोम, किजिचा माळ, मौदे आदी भागांचा समावेश आहे. अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे या भागातील भौगोलिक परिस्थितीत बदल झाला असून, उपकेंद्राची स्वतंत्र इमारत नसल्याने आरोग्य सेवा पुरविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे आखवणे येथे नवीन आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, मांगवली येथील समुदाय आरोग्य अधिकारी सुदर्शन साखरे यांची शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. मांगवली येथे नियमित आरोग्य सेवक व आरोग्य सेविका ही दोन्ही पदे रिक्त असून, केवळ कंत्राटी आरोग्य सेविकेमार्फत काम सुरू आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांची मूळ पदावर नियुक्ती करावी तसेच मांगवली उपकेंद्राच्या अतिरिक्त कार्यभारासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.












