सिंधुदुर्गसह आठ जिल्ह्यांतील ४५ प्रशिक्षणार्थींची नोंदणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : मोडीलिपीचे जतन, संवर्धन आणि तिचा अभ्यास करण्यासाठी वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शासनमान्य मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील ४५ प्रशिक्षणार्थींनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण वर्ग २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. प्रशिक्षण कालावधीत दररोज दोन तास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोडीलिपीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये व प्रशिक्षण शुल्क २५० रुपये, असे एकूण ३०० रुपये शुल्क आहे. इतर प्रशिक्षणार्थींसाठी प्रवेश शुल्क १०० रुपये व प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये, असे एकूण ६०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गासाठी ८० टक्के उपस्थिती अनिवार्य असून, पात्र प्रशिक्षणार्थींची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत किमान ५० गुण मिळविणाऱ्या प्रशिक्षणार्थींना उत्तीर्ण घोषित करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांनी शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच आधारकार्डची छायांकित प्रत द्यावी. इतर प्रशिक्षणार्थींनी आधारकार्डची प्रत व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सादर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, इतिहासप्रेमी, अभ्यासक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच मोडीलिपी शिकण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना या प्रशिक्षण वर्गात सहभागी होता येणार आहे. जागा मर्यादित असून काही जागा शिल्लक आहेत. इच्छुकांनी दोन दिवसांत प्रवेश निश्चित करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इतिहास विभागप्रमुख प्रा. एस. एन. पाटील (९८३४९८४४११) यांच्याशी संपर्क साधावा, असे महाविद्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.












