बँक एम्प्लॉयी फेडरेशन विभागीय सचिव कॉ. निखिल साटम यांचा सवाल
बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कणकवली (प्रतिनिधी) : 17 नोव्हेंबर 2026 रोजी कुडाळ स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये दरोड्याचा प्रयत्न झाला. यामध्ये बँकेतील महिला कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून मोठी रोकड लंपास करण्यात आली. भर वस्तीत गजबजलेल्या ठिकाणी पडलेल्या दरोड्यामुळे बँक कर्मचारी व ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बँक कर्मचारी यांच्यावर वारंवार विविध प्रकारे हल्ले होत आहेत. कधी चोरीचे उद्देशाने आलेल्या माथेफिरु, कधी ग्राहकांकडून तर कधी थेट राजकीय पुढाऱ्यांकडून बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांचा वर हल्ले होत आहेत.
वेळोवेळी पाठ पुरवठा व आंदोलन करूनही बँक व्यवस्थापन जाणीवपूर्वक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करत नसल्याचे आरोप महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलोयी फेडरेशन चे विभागीय सचिव कॉम्रेड निखिल साटम यांनी केले.
पूर्वी बँकेमध्ये बँकेमार्फत सुरक्षारक्षक नेमले जात, त्यानंतर प्रायव्हेट सेक्युरिटी एजन्सी मार्फत त्यांची नेमणूक केली जात परंतु आता कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी सर्वसामान्य बँक शाखेमध्ये दिसत नाही. अशा शाखांमध्ये काम करणाऱ्या असंख्य बँक कर्मचारी व दैनंदिन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांचे संरक्षण कोण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सर्व बँक शाखांमध्ये त्वरित सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ही त्यांनी केली. सदर घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाने बँकेमध्ये दैनंदिन कार्यकाळाच्या वेळी गस्त वाढवावे अशी मागणी करण्यात आली आहे.












