नागरिक नाक मुठीत धरून ; आंदोलनाचा इशारा
कुडाळ (प्रतिनिधी) : केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीमध्ये मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. याचा हुमरमळा, माड्याचीवाडी आणि आंदुर्ले या तीन गावांतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित मासे वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात हुमरमळ्याचे सरपंच अमृत देसाई आणि माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कंपनी प्रशासनाला यापूर्वीही या समस्येबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे अतुल बंगे यांनी सांगितले.
मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर सांडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याच्या दृष्टीने या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कंपनी प्रशासनाने या वाहतुकीचा बंदोबस्त करून समस्या सोडवली नाही, तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अतुल बंगे यांनी दिला आहे. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे तीनही गावांतील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.












