आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; अटकेची कारवाई सुरु
कणकवली (प्रतिनिधी) : नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 39 वर्षीय आरोपीला कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. महेंद्र गणपत घाडीगावकर ( वय 39, रा. किर्लोस, गावठाणवाडी, ता. मालवण ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसुद्धा पोलिसांनीही जप्त केली आहे. कणकवली तालुक्यानजिकच्या एका तालुक्यात नववीत शिकत असलेल्या पीडित मुलीशी आरोपी महेंद्र याची इन्स्टाग्राम वर ओळख झाली. आणि त्यातून आरोपीने खोटे बोलून, मोहात पाडून पीडितेवर कणकवली तालुक्यातील एका ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी 15 नोव्हेंबर रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचे घटनास्थळ कणकवली पोलीस ठाणे हद्दीतील असल्यामुळे सदर गुन्हा झिरो नंबरने कणकवली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. आरोपी महेंद्र याला बुधवार 18 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.












