डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची घोषणा
२४ नोव्हेंबरला पुण्यात होणार सन्मान
मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रफुल्ल वसंत देसाई यांची शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. CFTUI संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६ साठी हा पुरस्कार दि २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील मालधक्का, पुणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे प्रदान करण्यात येणार आहे.
शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून, समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळे समाज आणि राष्ट्राच्या विकासाला चालना मिळते. शिक्षण क्षेत्रात निष्ठेने व समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिले जातात. यावर्षी संघटनेतर्फे या पुरस्कारासाठी ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांची निवड झाल्याचे पत्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष गायकवाड, प्रदेश सचिव सत्यजीत जानराव आणि प्रदेश संघटक नईम इनामदार यांनी पाठविले आहे. या निवडीबद्दल संघटनेने आनंद व्यक्त करत देसाई यांचे अभिनंदन केले आहे
प्रफुल्ल देसाई हे गेली तीस वर्षे मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. तसेच कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज आणि वायरी येथील रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथपाल पदाचा सेवाभार देखील प्रफुल्ल देसाई हे सांभाळत आहेत. ग्रंथपाल म्हणून त्यांच्या ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
देसाई यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक आर डी बनसोडे, संस्थाचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सेक्रेटरी सुनील नाईक, विजयश्री देसाई, मुख्याध्यापिका देवयानी गावडे तसेच संस्थाचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे रेकोबा हायस्कुल वायरीचे मुख्याध्यापक संजय खोचरे आणि संस्थाचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांनी अभिनंदन केले आहे
देसाई यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारबद्दल मालवणच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून प्रफुल्ल देसाई यांचे अभिनंदन होत आहे









