मुंबई (प्रतिनिधी) : डॉ. सुनील सावंत यांच्या हिंदीभाषेतून मराठी भाषेत अनुवाद केलेला ललित लेख संग्रह “काळे पाणी लाल सूर्य” (अंदमान बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्यवीरांची वेदनामय जीवन गाथा) मूळ हिंदी लेखक हिमांशु जोशी, तसेच हिंदी भाषेतून मराठी भाषेत अनुवादित काव्यसंग्रह “आणीबाणीच्या कविता” मूळ हिंदी कवी हिमांशु जोशी व “डॉ. सुनील सावंत: कवी आणि कविता” (दुसरी आवृत्ती) हा डॉ. सुनील सावंत ह्यांच्या पाच काव्यसंग्रहातील कवितांवर आधारित बाळ राणे व शामल वेचलेकर यांनी लिहिलेला समीक्षा ग्रंथ वंदना प्रकाशन मुंबई ह्या संस्थेतर्फे रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा (प), मुंबई – १६ येथे प्रकाशित होणार आहे.
“डॉ. सुनील सावंत: कवी आणि कविता “हा समीक्षा ग्रंथ सन २००७ मध्ये “अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस”, वॉशिंग्टन येथे संदर्भ ग्रंथ म्हणून निवडला आहे. दरवर्षी येथे विविध भाषेतील पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून निवडली जातात. सन २००७ मध्ये ह्या मराठी भाषेतील पुस्तकास हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे.
आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांच्या ह्या तीन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. रामदास भटकळ, प्रकाशक, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई ह्यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी श्रीकांत बोजेवार, ज्येष्ठ पत्रकार व राजीव श्रीखंडे, जागतिक साहित्याचे अभ्यासक व सुप्रसिध्द लेखक, तसेच सुनीळ सामंत, ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, त्याच वेळी उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा सुध्दा आयोजित केला आहे, असे वंदना प्रकाशन, मुंबई ह्यांनी कळविले आहे.
भारतीय स्वातंत्र्यामागचे शूरवीर, भारतातील आणीबाणीच्या काळातील सामाजिक जीवन व मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय सन्मान याची महत्त्वपूर्ण भूमिका ह्या प्रकाशन सोहळ्यात विशद केली जाणार आहे.
साहित्य रसिकांना ह्या सोहळ्याचे विनाशुल्क निमंत्रण वंदना प्रकाशन, मुंबई ह्या संस्थेने दिले आहे.











