नगरपंचायतीच्या ठेक्यावरून एकाच पक्षातील दोन ठेकेदार आमनेसामने; तु-तु, मैं-मैंचे रूपांतर हमरीतुमरीत.

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील विकासकामांच्या ठेक्यावरून एकाच राजकीय पक्षाशी संबंधित दोन ठेकेदार शुक्रवारी सकाळी भर बाजारपेठेतच आमनेसामने भिडल्याची घटना घडली. कामाच्या वाटपावरून सुरू झालेली तु-तु, मैं-मैं थेट हमरीतुमरीपर्यंत पोहोचली. या प्रकाराची शहरात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.

नगरपंचायत हद्दीत कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे वाटप नुकतेच करण्यात आले. मात्र, सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने काँक्रिटीकरणाची कामे करू नयेत, अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काँक्रिटीकरणाची काही कामे ‘जैसे थे’ ठेवून हॉटमिक्सची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच कामांच्या वाटपावरून ठेकेदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

काम न मिळाल्याच्या नाराजीतून शुक्रवारी सकाळी दोन ठेकेदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला; मात्र काही वेळातच वाद वाढत जाऊन दोघेही एकमेकांना भिडले. भर बाजारपेठेत हा प्रकार घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमली. नेमका वाद कशावरून झाला, याची माहिती सुरुवातीला अनेकांना समजत नव्हती.

विशेष म्हणजे, दोन्ही ठेकेदार एकाच राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या घटनेला अधिक राजकीय रंग आला आहे. नगरपंचायतीतील विकासकामांच्या ठेक्यांवरून पक्षांतर्गत धुसफूस यापूर्वीही चर्चेत होती. आता त्याच नाराजीचे पडसाद थेट बाजारपेठेत उमटल्याने पक्षश्रेष्ठी या प्रकाराची कितपत गंभीर दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर ‘ठेकेदारांचा वाद केवळ कामापुरता आहे की पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे?’ याबाबत शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही ठेकेदारांवर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.


काही दिवसापूर्वी सुद्धा एका राजकीय पक्षाचे दोन पदाधिकारी कम ठेकेदार भर सभेतच ठेकेदारीवरून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समक्ष एकमेकांना भिडल्याची चर्चा वैभववाडी तालुक्यात सुरु असतांच ठेकेदारीवरून पुन्हा दोन ठेकेदार भर बाजारपेठत एकमेकाला भिडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वैभववाडीत चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

error: Content is protected !!