खारेपाटण हायस्कूलच्या १,००० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिजाऊ संस्थेचा स्तुत्य उपक्रम

खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोफत वह्या वाटप उपक्रमांतर्गत शेठ न. म. विद्यालय,खारेपाटण येथील हायस्कूलच्या सुमारे १,००० विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने नुकतेच वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने अमर राऊत उपस्थित होते. संपूर्ण कोकणा मध्ये ३५ लाख वह्या वाटपाचा संकल्प यावेळी संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, विश्वस्त विजय देसाई, डॉ. ए.डी.कांबळे, रवींद्र जठार, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सूर्यकांत भालेकर, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत यांसह प्रशालेतील शिक्षिका कोकाटे, शिक्षिका अमृते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेतील एकूण १००० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा जिजाऊ संस्थेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून,अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतो. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्थेच्या कार्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांचे विशेष आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेने पुढाकार घेऊन केलेली ही मदत अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक मदतीचा हात पुढे करणारा जिजाऊ संस्थेचा हा उपक्रम खारेपाटण परिसरात निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

error: Content is protected !!