पंचायत समिती सभेत सभापती रावराणे संतप्त; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या मासिक सभेचे निमंत्रण देऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह अन्य विभागांचे सक्षम अधिकारी सभेला उपस्थित राहत नसल्याने सभापती सिद्धेश रावराणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकारी सभेला गैरहजर राहून सभागृहाचा अवमान करीत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच प्रश्न मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा रावराणे व सदस्य मंगेश लोके यांनी दिला.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य मंगेश लोके, सुवर्ण संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तरेळे-गगनबावडा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा मुद्दा
तरेळे-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत मागील सभेत चर्चा झाली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सक्षम अधिकारी उपस्थित न राहिल्याने रावराणे व लोके संतप्त झाले. रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या असून लोखंडी सळ्या वर आल्या आहेत. तसेच वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही केबलही कामामुळे तुटल्या असून अद्याप दुरुस्ती झालेली नाही. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिकारीच उपस्थित राहत नसतील तर हा सभागृहाचा अवमान असल्याचे रावराणे यांनी सांगितले.
कृषी सहाय्यकांच्या गैरहजेरीवर कारवाईची मागणी
१२ नोव्हेंबर रोजी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नासिर काझी, देवानंद पालांडे व आपण कृषी कार्यालयात गेलो असता दहा पैकी एकही कृषी सहाय्यक उपस्थित नव्हता. काही कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्जही ठेवले नव्हते, असा आरोप मंगेश लोके यांनी केला. तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना कर्मचाऱ्यांची ही बेफिकिरी गंभीर असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देऊ, असा इशारा रावराणे व लोके यांनी दिला.
कुर्ली कालव्याच्या कामावरही प्रश्नचिन्ह
आचिर्णे-गडमठ दरम्यान सुरू असलेल्या कुर्ली धरणाच्या कालव्याच्या कामाच्या दर्जावरही सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रत्यक्ष झाडे नसताना झाडे तोडण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचा आरोप रावराणे यांनी केला. कालव्याच्या नलिकेसाठी आवश्यक दर्जाची वाळू वापरण्यात आलेली नसून पाटबंधारे विभागाने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीत तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला.
भुईबावडा मार्गावर एसटी बसची मागणी
भुईबावडा घाटातून सकाळी कोल्हापूरकडे आणि सायंकाळी कोल्हापूरहून भुईबावड्याकडे एसटी बस सुरू करण्याची मागणी लोके यांनी केली. सध्या विजयदुर्ग-पंढरपूर बस सुरू असली तरी ती दुपारच्या वेळेत असल्याने भुईबावडा पंचक्रोशीतील प्रवाशांना त्याचा अपेक्षित फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
वैभववाडी बसस्थानकातील समस्या, तालुक्यातील प्रवासी निवारा शेड, बसस्थानकात दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती आणि एसटी बस बुकिंगची सुविधा सुरू करण्याची मागणीही सभेत करण्यात आली.
‘कामे दर्जेदार नसतील तर बिले रोखणार’
सांगूळवाडी-निमअरुळे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठराव मंगेश लोके यांनी मांडला. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात येणार असून कामात तफावत आढळल्यास संबंधितांची बिले मंजूर करू दिली जाणार नाहीत, असा इशारा सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिला.











