ल. गो. सामंत विद्यालय आणि अ. म. पावसकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचालित ल. गो. सामंत विद्यालय आणि अ. म. पावसकर कनिष्ठ महाविद्यालय हरकुळ बुद्रुक येथे भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेची सांस्कृतिक मंत्री कु. प्रतिक्षा संजय पाटील हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ मुंबईचे कार्याध्यक्ष स. सी. दाभोळकर, शालेय समिती अध्यक्ष ओमप्रकाश ताम्हाणेकर, शालेय समिती सदस्य रामचंद्र वर्देकर, कनिष्ठ महाविद्यालय समिती सदस्य सुनिल घाडीगावकर, माजी विद्यार्थी आनंद म्हाडेश्वर, पालक संजय पाटील आणि सौ. पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नेवाळकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून ध्वजाला सलामी देण्यात आली. तसेच कवायतीचे विविध प्रकार करण्यात आले.

या निमित्ताने प्रशालेच्या ज. कृ. करमळकर सभागृहामध्ये पुढील कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात चित्रकला रेखाकला स्पर्धेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण तसेच सहभागी विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कलाशिक्षिका आर. आर. नवाळे यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नेवाळकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात स. सी. दाभोळकर, कार्याध्यक्ष हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करीत असतानाच विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि प्रशालेच्या कामकाजासंबंधी समाधान व्यक्त केले, तसेच सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका एस. एस. तांबे यांनी केले. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. पाटील यांनी आभारप्रदर्शनात सर्वांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!