सिंधुदुर्गात १० जून रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविणार

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती

कुडाळ ( अमोल गोसावी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत दिमाखात पदार्पण करत आहे. मागील २४ वर्षात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध सामाजिक पातळीवर यशस्वी वाटचाल करत महाराष्ट्रात तसेच देशात सन्मानजनक काम सर्व सामान्य जनतेसाठी केले. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जून रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
अमित सामंत यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात असे नमूद केले आहे की, १० जून रोजी सकाळी १०.१० वाजता आठही तालुका कार्यालयात पक्षध्वजारोहण करणे, (झेंडावंदन) त्यानंतर महापुरूषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून संविधानाचे सामायिक वाचन करणे, माजीसैनिक व स्वातंत्र्यसेनानी यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. शरद पवार यांचे “लोक माझे सांगाती” या पुस्तकाचे डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, पत्रकार, अधिकारी, प्रतिष्ठीत व्यक्ती यांना वाटप करण्यात येईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय शिबिर, रक्तदान शिबीर, आयोजित केले आहे. शेतकऱ्यांना भात बियाणे वाटप करणे, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना चादरी वाटप करणे, असे विविध उपक्रम १० जून रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून संपूर्ण दिवस प्रत्येक तालुक्यात राबविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!