माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांचा आरोप : लवकरच पोलखोल करण्याचा दिला इशारा
कणकवली (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून अनागोंदी कारभार सुरू आहे. जि. प. बांधकाम विभागाने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण दाखवत निविदा अपात्र ठरविण्यात आली. मात्र, याच कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जि. प. सिंधुदुर्ग यांनी त्याच ठेकेदाराला विविध कामे दिलेली आहेत. सार्वजनिक बांधकामचे येथील कार्यकारी अभियंता कामे मॅनेज करत आहेत. एवढेच नव्हे तर अशी अनेक प्रकारची कामे ते मॅनेज करत असून त्याचा पोलखोल लवकरच केला जाईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. सावंतवाडी येथील ठेकेदार चंद्रकांत बिले यांनी सोनवडे तर्फ कळसुली येथील शाळा इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण केले नाही. म्हणून त्यांना यादीत टाकल्याचे पत्र जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी काढले. परंतु, ठेकेदाराने सदरचे काम पूर्ण केलेले असून त्याचे अंतिम देयकही झाले आहे. असे असताना ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण सांगत सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांनी करंजे कुंभारवाडी सातोसेवाडी नारकरवाडी नदीवर साकव बांधणे हे काम त्या ठेकेदाराची निविदा ओपन न करताच नाकारले. जि. प. व सार्वजनिक बांधकामच्या कामाबाबत स्वतंत्र नोंदणी असतानाही जिल्हा परिषदेच्या कामासाठीचे निकष सार्वजनिक बांधकाम विभागाने लावून नियमबाह्यरित्या निविदा अपात्र ठरविण्यात आली. विशेष म्हणजे याच कालावधीत म्हणजे जि.प.च्या बांधकाम विभागाने काळ्या यादीत टाकल्याचे पत्र दिल्यानंतर जि.प.च्याच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी जलजीवन मिशनची कामे, पाटबंधारे विभाग अंबडपाल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांनी याच ठेकेदाराला निविदा स्वीकारून कामे दिलेली आहेत. या साऱ्याचा विचार करता येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हे जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांमधील काही मंडळींना हाताशी धरून कामे मॅनेज करत आहेत. तसेच अनेक निविदा चुकीच्या पद्धतीने ओपन करणे, रक्कम वाढविणे असे प्रकार करत आहेत. त्यांच्या सुरू असलेल्या या कार्यपद्धतीचा आम्ही लवकरच पोलखोल करू. त्यांची ही मनमनी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा पारकर यांनी दिला आहे.












