सावंतवाडी (प्रतिनिधी) : वन अकादमी कुंडल येथे २१ व २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या कोल्हापूर वनवृत्तस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये सावंतवाडी वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कैतुकास्पद कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारामध्ये १४ सुवर्ण, १४ रौप्य व ७ रजत अशी एकूण ३५ पदके पटकावुन वृत्तस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.
अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने वन अकादमी कुंडल येथे कोल्हापूर वनवृत्तातील सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हयांतील मिळून ६ वनविभाग सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत सर्व विभागाचे सुमारे ३०० स्पर्धक खुला गट, वेटरन, सिनीयर वेटरन व महिला गटामध्ये सहभागी झाले होते.
कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक श्री. एम. रामानुजम यांचे प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. चालु वर्षी सावंतवाडी वनविभागाच्या स्पर्धकांनी ॲथलेटीक्स, थाळी फेक, गोळा फेक, बुद्धीबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल इ. क्रीडा प्रकारामध्ये पदकं मिळवत उत्तम कामगीरी केली. यामध्ये श्री. ब्रम्हकुमार भोजने वनरक्षक कोलगाव यांनी ॲथलेटीक्स चा राजा’ हा पुरस्कार मिळविला. श्री. संग्राम पाटील वनरक्षक इन्सुली तसेच ५९ वर्षे वयाचे श्री. गोविंद सावंत, वनमजुर आंबेरी नाका, कुडाळ यांनी एकूण ६ पदके मिळवत मॅन ऑफ द टुर्नामेंट’ हा किताब मिळवीला.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्व पदक विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देवून उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांचे हस्ते विभागीय कार्यालय सावंतवाडी येथे गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरावर वनसंरक्षणाचे कामाकरीता रजत पदक विजेते श्री. सावळा कांबळे वनपाल मठ-वेगुर्ला यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी श्री. रेड्डी म्हणाले, वने व वन्यजिवांचे संरक्षण संवर्धन करीत असताना वन अधिकारी कर्मचारी यांचे मध्ये सांघिक भावना निर्माण होवून त्यांचे विविध कलागुणांना वाव मिळून स्वास्थ्य चांगले रहावे या हेतुने विभागीय क्रिडा स्पर्धा आयोजित केले जात असल्याचे सांगुन वनसंरक्षणाचे कामामध्ये देखील वनकर्मचारी अधिकारी यांनी अशीच दैदिप्यमान कामगिरी करुन विभागाची प्रतिमा उंचवावी.
सदर स्पर्धा श्री. एस. नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. स. बा. सोनवडेकर सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अमृत शिंदे, श्री. मदन क्षिरसागर, श्री. अमित कटके, श्री. अरुप कन्नमवार, श्री. राजेंद्र घुणकिकर व श्रीम. विद्या घोडके यांनी यशस्वी केली.













