८० वर्षीय माजी विद्यार्थीनी सीमा सावंत-साटम यांची मसुरे नं.१ शाळेला एक लाखाची देणगी

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे नं.१ केंद्रशाळेची माजी विद्यार्थिनी श्रीम. सीमा साटम पूर्वाश्रमीच्या सीमा कानू सावंत- वय ८० यांनी आपला भाचा निवृत्त तलाठी मसुरे धनंजय सावंत यांचे मार्फत मसुरे नं.१ शाळेला भरघोस अशी एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत दिली. श्रीम.सीमा साटम या भारतीय आर्मीचे लेप्टनंट जनरल कुलभूषण गवस यांच्या सासू होत. सुमारे 160 वर्षे पूर्ण होत आलेल्या मसुरे नं.१ शाळेत सुरु असलेले विविध उपक्रम,शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळालेले अपूर्व यश,शिक्षकांची मेहनत व योगदानाची माहिती धनंजय सावंत यांचे मार्फत श्रीमती सीमा साटम यांच्या कानावर गेली. आणि ८० वर्षाच्या या माजी विद्यार्थिनीने आपल्या शाळेबद्दल असलेले प्रेम,जिव्हाळा,आपुलकी या भावनेने शाळेला शैक्षणिक मदत केली. धनंजय सावंत यांच्यामार्फत मसुरे नं.१ शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका शर्वरी शिवराज सावंत,नुतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल शैलेश मसुरकर,उपाध्यक्ष संतोष दुखंडे,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर यांजवळ सुपूर्द केली.यावेळी शिक्षणप्रेमी सदस्य लक्ष्मी दत्तप्रसाद पेडणेकर, विनोद सातार्डेकर सर, गोपाळ गावडे सर, रामेश्वरी मगर मँडम व विद्यार्थी उपस्थित होते. सदर एक लाख रुपये रक्कम ठेव स्वरुपात ठेवण्यात येऊन दरवर्षी मिळणाऱ्या व्याजातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाणार आहे.श्रीम.सीमा साटम यांनी दिलेल्या या शैक्षणिक मदतीसाठी मसुरे नं.१ शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ व तमाम मसुरे ग्रामस्थ यांज कडून विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!