पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्या उपस्थितीत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांनी नोंदवला चित्रकला स्पर्धेत सहभाग
वैभववाडी (प्रतिनिधी): राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी (औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त) मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचे व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले असून या विभागाच्या दिनांक 17 ऑगस्ट 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात आले आहे. या कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात-निर्यात यावर देशात बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय विभागाने उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. राज्यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांनी 26 जून या दिवशी आपल्या परिसरातील शाळा व स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. गावात/शाळामधून अमली पदार्थ विरोधी फेरी काढणे, अमली पदार्थावर बंदी याविषयी निबंध स्पर्धा आयोजित करणे, व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती याविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, अमली पदार्थावर पथनाट्याचे आयोजन करणे, अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे, अमली पदार्थाच्या सवयी सोडविण्यासाठी या दिवशी निर्धार प्रतिज्ञा देणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय येथे आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलिस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना ड्रॉइंग कागद पुरविण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पोलिस ठाण्याच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अमली पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात त्यांचे सेवन करू नये या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली होती. पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पी.एम.पाटील, पोलिस हवालदार अभिजित तावडे, माधुरी अडुळकर यांच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील, कला शिक्षक एम.एस.चोरगे., प्रशालेचे शिक्षक पी.बी.पवार, एस.टी.तुळसणकर, पोलिस हवालदार अभिजित तावडे, माधुरी अडुळकर आदी शिक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.












