ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील 2007 ते 2016 म्हणजे 2017 पूर्वीपर्यत अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणारे अनेक शिक्षक आहेत. मात्र या कालावधीतील शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गने कार्यवाही केलेली नाही. असे शिक्षक अत्यृउत्कृष्ट आगाऊ वेतनवाढीसाठी पात्र आहेत. तरी त्यांना आगाऊ वेतनवाढी लागू करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी केली आहे.
शासनाने आगाऊ वेतनवाढी रद्द करण्याबाबतचा शासन आदेश 24 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमित केल्याने त्यापूर्वी अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणा-या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी लागू करणे आवश्यक आहे. अशी आमची ठाम मागणी आहे. तसेच विविध न्यायनिर्णयांमध्ये न्यायालयानेही याबाबत शासनाला आदेशित केलेले आहे, असे पाताडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. इतकी वर्षे वाट पाहूनही आगाऊ वेतनवाढी लागू होत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. तरी सदरच्या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी देण्यात याव्यात अथवा न्यायालयात जाण्याची परवानगी तरी दयावी. अशी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने मागणी करण्यात येत आहे, असे संतोष पाताडे यांनी म्हटले आहे.