(ब्यूरो न्युज) : जून महिन्याच्या शेवटचा आठवडा आल्यावर मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुणे अन् मुंबई जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे. मुसळधार पावसामुळे समुद्रात हाय टाईड देखील होणार आहेत. त्यामुळे रविवारी सुटी असताना मुंबईतील चौपटी पर्यटनासाठी बंद केली आहे. पुणे शहरात शनिवारी पाऊस झाल्यानंतर रविवारी दुपारी जोरदार पाऊस सुरु झाला. आता मुंबई, पुणेपर्यंत मर्यादीत असलेला पाऊस संपूर्ण राज्यात दाखल झाला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी दिली.
यंदा मान्सून लांबतच चालल्याने राज्यातील अनेक जलप्रकल्पांतील उपयुक्त साठा कमी झाला होता. राज्यातील मोठे अन् मध्यम प्रकल्पांतील साठाही कमी होत होता. यामुळे शहरी भागातही चिंता निर्माण झाली होती. परंतु आता आनंदाची बातमी आली आहे. राज्यात मान्सूनने सक्रीय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. तसेच गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत रविवारी पाऊस सुरु झाला आहे. यामुळे राज्यात सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. रविवारी कोकण, विदर्भातील काही भाग अन् मुंबई, पुणे भागात पाऊस पडत आहे. पुण्यात रविवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लावली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर आणि आज सकाळपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा शहर अन् परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. आता आज अन् सोमवारीही पुणे शहरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.













