डॉ. संदीप सांळुखे यांचे प्रतिपादन
कणकवली (प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराज हे स्वातंत्र्यप्रेमी लोकराजे होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्षपणे त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. राजर्षी शाहू महाराज हे एका अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान होते,असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे विशेष मानद अधिकारी डॉ.संदीप साळुंखे यांनी केले. कणकवली महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्याय दिन सांस्कृतिक विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सांळुखे बोलत होते. यावेळी विचारमंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा.डॉ. राजश्री सांळुखे , महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.युवराज महालिंगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळकृष्ण गावडे,ज्युनिअर विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हरीभाऊ भिसे उपस्थित होते. डॉ. सांळुखे पुढे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारे ते भारतातील एकमेव राजे ठरतात. केवळ सवर्ण जाती वरून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या बंद व्हाव्यात व जे जे शिक्षण घेतील त्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून त्यांनी सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली.गावगाड्यातील महसुलाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पगारी नोकर नेमले.यातून त्यांनी ग्राम स्वराज्याचा पाया घातला’ असे ते म्हणाले.यावेळी प्राचार्य युवराज महालिंगे यांनीही छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. डॉ.राजश्री सांळुखे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य स्पष्ट केले.’ आजच्या विद्यार्थ्यानी एकविसाव्या शतकातही शिक्षण ,ज्ञान व समृद्धी वाढीस लावणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा हडकर व आभार प्रा.हरीभाऊ भिसे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमास प्राध्यापक वृंद ,विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.