स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट येण्यासाठी नितेश राणेंचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष – सुशांत नाईक

मंत्रिपदाच्या मागे फिरण्यापेक्षा सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, साधन सामुग्री पुरवा

उबाठा शिवसेना शिष्टमंडळाने उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या घेतल्या जाणून

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांच्यावर जाळ काढणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आधी स्वतःच्या मंत्रिपदाच्या मागे फिरण्यापेक्षा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक असणारी साधनसामुग्री आणि रिक्त असलेले डॉक्टर ची पदे भरावीत. स्वतःच्या पडवे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये पेशंट यावेत म्हणूनच आ.नितेश राणे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा चे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेत नेमक्या कोणत्या समस्या आहेत याची माहिती शिवसेना उबाठा च्या शिष्टमंडळाने सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांची भेट घेऊन घेतली. यावेळी माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी,वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, योगेश मुंज, सचिन आचरेकर, वैभव मालंडकर, तेजस राणे, सोहम वाळके, नितेश भोगले आदी उपस्थित होते. यावेळी सुशांत नाईक यांनी डॉ धर्माधिकारी यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर येथेच पूर्ण उपचार व्हायला हवेत. गरज नसताना रुग्ण रेफर करू नकात अशी सक्त सूचना करतानाच हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक साधनांच्या कमतरटेबद्दल माहिती घेतली. त्यावेळी डॉ धर्माधिकारी यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना श्वसनाचा त्रास झाल्यास लागणारा निओनेटल व्हेंटिलेटर, वर्कस्टेशन ऍनस्थेशिया मशीन, हाडांच्या ऑपरेशन साठी आवश्यक सीआर्म मशीन, एक्सरे लेझर प्रिंटर, लेप्रास्कोप मॉनिटरसह, ऑर्थोपेडीक ऑपरेशन साठी लागणारी सर्व इन्स्ट्रुमेंट आदी साधनसामुग्री नसल्याचे सांगितले.तसेच कायमस्वरूपी मंजूर असलेल्या 17 वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी केवळ 3 पदे भरलेली असून स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ञ, फिजिशियन ही तातडीची आणि अत्यावश्यक पदे रिक्त आहेत.सध्या कंत्राटी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात असून त्यांच्याद्वारे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही सांगितले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी रिक्त पदे आणि अत्यावश्यक साधनसामुग्री खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.तसेच माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी कणकवली शहरातील खाजगी डॉक्टर आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची मिलीभगत असून रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये रेफर केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. असे असेल तर हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!