सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर निरा नदीच्या तिरावर शिंदेवाडी (ता. खंडाळा) इथं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी शरद पवार, आमदार रोहित पवार व प्रतिभाताई पवार यांच्या सोबत वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील हे सुद्धा सोबत असल्याचं पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या. अजित पवार यांच्या राजकीय बंडावेळी मकरंद पाटील यांचं नाव असल्याचं सांगण्यात आल्याने आज आमदार मकरंद पाटील हे शरद पवारांसोबत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. आता शरद पवारांसोबत पाहून त्यांची गोची होणार आहे. दरम्यान, शरद पवार यांचे पुष्पहार व प्रचंड घोषणाबाजी करून जिल्ह्याच्या प्रवेशव्दारावर स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, मनोज पवार, राजेंद्र तांबे, सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच ताहेर काझी, हणमंतराव सांळुखे, अजय भोसले, आदेश भापकर,अमीर काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर खंडाळ्यातही पवारांचे विजयराजे धमाळ व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत केलं.