आमदार वैभव नाईक यांचे गौरवउद्गार
साकेडी येथे जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचा शुभारंभ
स्पर्धेत भगवती प्रसादिक भजन मंडळ तोरसोळे भजन मंडळ प्रथम
कणकवली (प्रतिनिधी) : छोट्या गावांमध्ये स्पर्धा भरवताना अनेक अडचणी असतात. मात्र या अडचणींवर मात करून वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक मंडळाच्या वतीने वारकरी भजन स्पर्धा गेली काही वर्षे सातत्याने व उत्साहाने भरविल्या जात आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवउद्गार कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काढले. साकेडी शाळा नंबर 1 जवळ चव्हाटा येथे वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय वारकरी निमंत्रित संघाच्या भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनानंतर श्री. नाईक बोलत होते. तब्बल एक तास आमदार वैभव नाईक आपले बिझी शेड्युल बाजूला ठेवून भजन ऐकण्यांत दंग झाले होते.
या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, साकेडी सरपंच सुरेश साटम, उपसरपंच प्रज्वल वर्दम, माजी सभापती संजय शिरसाट, माजी सरपंच रीना राणे, लक्ष्मण राणे, मुरारी राणे, बुवा गोपी लाड, शशिकांत राणे, किशोर दळवी, सुरेश नर, मंडळाचे सागर मेस्त्री, निलेश सावंत, सागर राणे, महेश मेस्त्री, निनादन नर यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते व महेश देसाई, नितीन राऊळ, परीक्षक विलास ऐनापुरे, सूत्रसंचालक राजा सामंत यांच्यासह गावातील अन्य मान्यवर देखील उपस्थित होते. या भजन स्पर्धेच्या निमित्ताने दशावतारातील सुप्रसिद्ध कलावंत आप्पा दळवी, राजू हरयाण, सुरेश गुरव, कांता मेस्त्री आदींचा त्यांनी दशावतारी कलेत दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दशावतारी कलावंतांच्या सत्काराचा भजन स्पर्धेच्या निमित्ताने वेगळा पायांना पडत लोककला जोपासणाऱ्या कलाकारांचा गौरव या निमित्ताने झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, भजन, दशावतार या लोककला आपल्या कोकणच्या आहेत व या लोककला जपण्याचे काम या मंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. कोकणच्या या लोककलास आता साता समुद्रापार गेल्या आहेत व अशा लोककला वृद्धिंगत करण्यासाठी मंडळाने हाती घेतलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. तरुणांनी या कला जिवंत ठेवल्या तर या कला व त्यातील कलावंतांना निश्चितच सोन्याचे दिवस येतील, असे उद्गार देखील श्री. नाईक यांनी काढले. सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आता आपल्या लोककला आता साता समुद्रापार गेल्या आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या लोककलांना लोकाश्रय मिळू लागला आहे. या लोककला जिवंत ठेवण्यासाठी लोकांनीसुद्धा या कलावंतांना प्रोत्साहन व प्रतिसाद दिला पाहिजे, असे उद्गार श्री. नाईक यांनी काढले. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी मार्गदर्शन करताना वारकरी भजन संस्कृतीमध्ये पुरुषप्रधान भजन संस्कृती यापूर्वी आपण पाहिली. मात्र आता महिला देखील वारकरी भजन स्पर्धेमध्ये उतरू लागल्याने हे एक चांगले संकेत मिळू लागले आहेत. महिलांनी या क्षेत्रात देखील अग्रभागी राहिले पाहिजे, असे उद्गार त्यांनी काढले. वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळाने आपली संस्कृती जतन करण्याचे काम केले आहे. अशा नवतरुण कार्यकर्त्यांना आपण सर्वांनीच प्रोत्साहन दिलं पाहिजे असेही श्री. राणे म्हणाले.
या भजन स्पर्धेत एकूण सहा भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. या मध्ये प्रथम क्रमांक भगवती प्रसादिक भजन मंडळ तोरसोळे, द्वितीय क्रमांक विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आचरा, उत्तेजनार्थ लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ कासरल, उत्कृष्ट गायक बुवा लवु घाडी, उत्कृष्ट पखवाज वादक तुषार गावडे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून विलास ऐनापुरे यांनी उपस्थित संघांना व भजनी बुवांना मार्गदर्शन देखील केले. तसेच या संघांना काही टिप्स देखील दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक मंडळाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीने राजा सामंत यांनी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांचे आभार मंडळाचे सागर मेस्त्री यांनी मानले.