आमदार नितेश राणेंच्या हस्ते 3 फेब्रुवारी रोजी सायं. 4.30 वाजता होणार उद्घाटन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न महिला बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता श्रीदेवी भराडी मंदिर आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे. आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक नितेश राणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक संदीप परब, व्हीक्टर डांटस, मेघनाथ धुरी, नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे, सिंधुदुर्ग सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, मसुरे मर्डे सरपंच संदीप हडकर, आंगणेवाडी विकास समिती अध्यक्ष भास्कर आंगणे, देऊळवाडा सरपंच नरेंद्र सावंत, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष (उमेद) चे व्यवस्थापक वैभव पवार, बिळवस आंगणेवाडी सरपंच मानसी पालव यांचीही उपस्थिती असणार आहे. बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा बँक संचालक मंडळ आणि जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.