अन्यथा उपोषणाचा माजी संचालक अजित नाडकर्णींचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी अर्बन बँकेतील ठेवीदार आणि खातेधारकाना अर्बन बँकेत ठेवलेले स्वतःचे पैसेही काढता येत नाहीत. बँक कार्यालये सुरू असली तरी आर्थिक व्यवहार बंद आहेत. गणेश चतुर्थी सणापूर्वी लोकांचे पैसे देण्याचे नियोजन करा अन्यथा 16 ऑगस्ट रोजी अर्बन बँकेच्या शाखेसमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात नाडकर्णी यांनी म्हटले आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुरू असून आर्थिक व्यवहार बंद आहेत. शेतीकामे, प्रापंचिक अडचणी आणि आर्थिक देवाणघेवाण यासाठी लोकांना त्यांचे पैसे आपल्या बँकेत असूनही त्यांना मिळत नाहीत. गणेशोत्सव तोंडावर असून लोकांना बँकेतील त्यांचेच पैसे मिळत नसल्याचे निराश व्हावे लागते . गणेशोत्सव पूर्वी लोकांना त्यांचे अर्बन बँकेतील पैसे देण्याबाबत सुवर्णमध्य काढावा अन्यथा 16 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार आहे.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी बँकेची राहील.













