खारेपाटण आराेग्य केंद्राला एम.बी.बी.एस.डॉक्टर मिळावा

ग्रामस्थानी सी.ओ.व डी.एच.ओ यांची भेट घेऊन मागणीचे दिले निवेदन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय महत्वाचे असलेले कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला गेली बरेच वर्षे पूर्णवेळ एम बी बी एस डॉक्टर नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.तरी या आरोग्य केंद्राला तातडीने एम बी बी एस डॉक्टर मिळावा याकरीता आज खारेपाटण ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची ओरोस जिल्हा मुख्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन खारेपाटण गावांसाठी तातडीने पूर्णवेळ एम बी बी एस डॉक्टर देण्यात यावा.अशी लेखी मागणी केली.खारेपाटण गावच्या वतीने यावेळी माजी सरपंच रमाकांत राऊत,विद्यमान उपसरपंच महेंद्र गुरव,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,मंगेश गुरव,संतोष पाटणकर,राजेंद्र वरुणकर, ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साै.धुरी,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदेश कांबळे हे अधिकारी देखील उपस्थित होते. खारेपाटण गावातील प्रा.आ.केंद्रावर कणकवलीसह देवगड,वैभववाडी व राजापूर तालुक्यातील सुमारे ४०ते ५० गावचे नागरिक प्राथमिक उपचाराकरिता खारेपाटण प्रा.आ.केंद्रात येत असून त्यांना हे सोयीचे आरोग्य केंद्र वाटत आहे. असे असताना इथे पुर्ण वेळ एम बी बी एस डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाचे तसेच नागरिकांचे हाल होत असल्याचे खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी मुख्य कार्य.अधिकारी यांना सांगितले.तसेच खारेपाटण प्रा.आ.केंद्र हे हायवे वरील प्रमुख प्रा.आ.केंद्र असल्याने येथे अपघाताचे जखमी रुग्ण सातत्याने येत असतात.त्यामुळे शासनाची १०८ ही तातडीची सेवा देणारी ऑम्बुलंस गाडी खारेपाटण दशक्रोशोतील नागरिकासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्य कार्य.अधिकाऱ्यांकडे केली.ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून लवकरच खारेपाटण गावाला पूर्णवेळ एम बी बी एस डॉक्टर देन्यात येईल तसेच १०८ ही अॅम्बुलन्स गाडी देखील खारेपाटण येथील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येईल. असे आश्वासन यावेळी उपमुख्य कार्य.अधिकारी श्री कापडणीस यांनी ग्रामस्थांना दिले.तर याबाबत लवकरच जिल्हा आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी खारेपाटण प्रा.आ.केंद्राला भेट देऊन येथील नागरिकांच्या व रुग्णाच्या सोयी सुविधांची पाहणी करतील.खारेपाटण गावच्या आरोग्य सोयी सुविधां विषयक असलेल्या समस्या मिटविण्यात येतील असे देखील आरोग्य विभागाच्या वतीने सगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!