गवारेड्यानी केलेय काजू भातशेतीचे नुकसान
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गवा रेड्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईबाबत चर्चा केली.आमदार नितेश राणेंच्या निर्देशानंतर रेड्डी यांनी कणकवली सह वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही शीघ्रगतीने करण्याची ग्वाही दिली.यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर , भालचंद्र साठे आदी उपस्थित होते. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा ऐनारी गावात गवा रेड्यानी उच्छाद मांडला असून भातशेतीसह नव्याने लागवड केलेल्या काजू रोपेही उध्वस्त केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले आहे.तसेच कणकवली तालुक्यातील असलदे, फोंडाघाट येथेही गवा रेड्यानी भातशेतीचे नुकसान केले आहे. याबाबत आमदार नितेश राणे यांनी उपवनसंरक्षक रेड्डी यांना बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी निर्देश केले. त्यानुसार शीघ्रगतीने नुकसानभरपाई चे प्रस्ताव करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देणार असल्याचे रेड्डी म्हणाले.













