वर्षभरापुर्वी मु.शिरूर जि.पुणे येथून मनोरूग्णावस्थेत भरकटलेल्या महिलेचे करण्यात आले कुटुंब पुनर्मिलन
खारेपाटण (प्रतिनिधी) : तालुका शिरूर जि.पुणे येथून वर्षभरापुर्वी भरकटलेल्या व देवगड जि.सिंधुदुर्ग येथे सापडलेल्या पुष्पा खोले (वय वर्षे ४५ ते ५०) या मनोरूग्णा वस्थेतील महिलेला देवगड पोलिस स्टेशन (जि.सिंधुदुर्ग) च्या पोलिसांनी दि.३१ जुलै,२०२२ रोजी संविता आश्रमात दाखल केले होते. या महिलेला जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच शिरूर पोलिस स्टेशन येथे तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देवून तिचे कुटुंब पुनर्मिलन केले.
महिलेच्या कुटुंब पुनर्मिलनाच्या पार्श्वभूमिवर बोलताना संदिप परब यांनी “माणसांना होणा-या शारिरीक आजारांप्रमाणेच मानसिक आजारांचे आपल्या देशातील प्रमाण अधिक असून दिवसें दिवस वाढत आहे.आणि म्हणून मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या बांधवांची कुटुंबिय, समाज, संस्था आणि शासन व्यवस्थेने सर्वोत्तोपरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे”… प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे सचिव श्री संदीप परब यांनी यावेळी व्यक्त केले.
जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार,बेघर व वंचितांचे पुनर्वसनासाठी गेली दहा वर्षाहून अधिक काळ कार्यरत असून संस्थेचे मुंबई,पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा येथील आश्रम आणि शेल्टर होमद्वारे कार्य सुरू आहे.संविता आश्रमातील औषधोपचाराने हळूहळू बरे झालेल्या पुष्पाने तिच्या शिरूर येथील राहत्या ठिकाणाची, माहेरचे गाव अष्टापूरची व तिच्या कुटुंबियांची माहिती दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुगलसर्च द्वारे शिरूर पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक मिळवून शिरूर पोलिसांशी व पुष्पाच्या कुटुंबियांशी संवाद केला.
शिरूर शहरात मोलमजूरी करून उदरनिर्वाह करीत असलेल्या पुष्पाचे कुटुंबात पती ज्ञानेश्वर व सासू यांचेसह साहिल आणि तेजा ही दोन मुले असून एक विवाहित मुलगी आहे. दिनांकः८ आँगस्ट,२०२३ रोजी जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे व सोशिअल वर्कर रत्ना लांघी यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे पुष्पा चे पती ज्ञानेश्वर यांची भेट घेवून पोलिस स्टेशनच्या माध्यमातून पुष्पा हिला पतीच्या स्वाधीन केले. यावेळी शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय जगताप, ठाणे अंमलदार एपिआय रमेश कदम व पोलिस अधिकारी श्री.व्हि.डि.दहिफळे यांचे चांगले सहकार्य झाले. जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रम, समर्थ आश्रम मधील सर्व सेवा कार्यकर्ते ,नर्स सह सर्व स्टाफने पुष्पाची आश्रमात सर्वोत्तोपरी काळजी घेतली.