साथरोगांच्या पार्श्वभूमीवर एसटी स्टँड, रेल्वे स्थानक परिसरात आरोग्य पथक नेमावे
कणकवली तालुका प्रवासी संघाची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कोकणाच्या विकासाचा दुवा असलेला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेळीच पूर्ण करावे. यंदा रेल्वे व एसटीतून येणाऱ्या चाकरमान्यांसह प्रवाशांना रेल्वे व एसटी प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा द्याव्यात व साथीचे आजार व रोगांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात यासह आदी महत्वाचे ठराव, कणकवली तालुका प्रवासी संघाच्या बैठकीत घेण्यात आले.
कणकवली तालुका प्रवासी संघाची मासिक बैठक नुकतीच नगरपंचायतीच्या ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात अध्यक्ष मनोहर पालयेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव सी. आर. चव्हाण, खजिनदार सखाराम सपकाळ, अॅड. संदीप राणे, केशव जाधव, रवींद्र कडुलकर, राजाराम परब, विलास चव्हाण, महानंदा चव्हाण, ऋषिकेश कोरडे आदी उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समस्या लक्षात घेऊन विविध खात्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सोयीच्यादृष्टीने निवेदने देण्यात आली. याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे साथीचे आजार व रोग टाळण्यासाठी बसस्थानक व रेल्वे स्थानकामध्ये तातडीने आरोग्य तपासणी करणारी पबके नेमावीत. गौरी-गणपती सणापूर्वी सर्व बसस्थानके व रेल्वे स्थानक परिसर खड्डेमुक्त करावा आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.