जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट) च्या वतीने आयोजन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या काही निवडक शाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून निवडल्या असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या मॉडेल स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची कार्यशाळा नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ओरोस सिंधुदुर्ग येथे डायटच्या प्राचार्य अनुपमा तावशीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मुक्ता फाउंडेशनच्या स्वप्नाली जठार यांनी आदर्श शाळा आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना दिली. तर जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित जिल्ह्यातील मॉडेल स्कूलच्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना मार्गदर्शन केले. “लोकसहभागातून शाळांचा विकास” या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले.
“जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा गुणवत्ता दर्जा टिकविण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे. तेवढीच जबाबदारी समजातील जागरूक नागरिकांची आहे. तर शाळेचे मुख्यद्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ही रथाची दोन चाके असून या दोघांमध्ये जर योग्य समन्वय असेल तर शाळांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. तसेच ज्या दिवशी मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वार यांकडे जाणारी नागरिकांची पावले शाळांकडे वळतील. त्यादिवशी शाळांचा खऱ्या अर्थाने विकास व्हायला सुरवात होईल”, असे भावपूर्ण उदगार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या मॉडेल स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ओरोस आयोजित जिल्ह्यातील मॉडेल स्कुल प्राप्त शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले. तसेच प्रत्येक शाळेतील पालकांनी विद्यार्थ्यांच्या “अध्ययन निष्पती बाबत ” जागृत असणे गरजेचे असल्याचे डायटच्या प्राचार्य अनुपमा तावशीकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून निवड झालेल्या ९ शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधिव्याख्याता श्री. जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन व सर्वांचे आभार मुक्ता फाउंडेशन संस्थेच्या कार्यकर्त्या स्वप्नाली जठार यांनी मानले.