ब्युरो न्युज (प्रतिनिधी) : देशभरात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 88 मिनिटे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच देशातील युवकांना संदेशही दिला. तसेच पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून भाषण करणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पुढील वर्षी या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश मांडणार आहे. मी तुमच्यातून आलोय,तुमच्यसाठी जगतोय. मी स्वप्न देखील तुमच्यासाठी पाहतोय. मी कष्ट करतोय ते देखील तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही मला ही जबाबदारी दिली म्हणून मी हे करत नाही तर हा देश माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना दु:ख झालेले मी पाहू शकत नाही.
भ्रष्टाचाराच्या विरोधात अखंड लढणार आहे. देशातून परिवारवाद उखडून लावणार आहे. लोकशाहीत परिवारवादी पक्ष ही विकृती आहे. परिवारवादामुळे विकासाला ब्रेक लागला आहे. लांगुलचालनाच्या विरोधात लढा राहणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2014 साली मी तुम्हाला आश्वासन दिले होते. मी देशात परिवर्तन आणणार.140 कोटी कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या माध्यमातून दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासाठी नेशन फर्स्ट आणि राष्ट्र सर्वोपरी आहे. 2019 साली तुम्ह परिवर्तनाच्या आधारावर पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आहे.