मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे आंगणेवाडीला येत आहेत. आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मर्यादित दौरा असला तरी नक्कीच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीतरी देऊन जातील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
भराडी यात्रेला एक पारंपारिक स्वरूप आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी, कुणकेश्वर परिसराचा विकास, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेच्या मनातील काम करत आहेत. दोघेही मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काहीतरी भरीव तरतूद करतील याची मला त्यांचा एक सहकारी म्हणून खात्री आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.