मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या उपस्थितीत आ. रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली केला शिवसेनेत प्रवेश
देवगड जामसंडे शहरात उबाठा सेनेला मोठा धक्का
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : देवगड जामसंडे न पं च्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि नगरसेवक रोहन खेडेकर यांनी उबाठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना उपनेते आ रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली साक्षी प्रभू आणि खेडेकर यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेचा भगवा हाती घेतला.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेना उपनेते आ रवींद्र फाटक ,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, विधानसभा संघटक संदेश पटेल, तालुकाप्रमुख अमोल लोके,खारेपाटण येथील शिवसेनेचे पदाधिकारी तथा युवा उद्योजक रुपेश सावंत आदी उपस्थित होते. साक्षी प्रभू आणि रोहन खेडेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून देवगड न पं मध्ये सत्तेत होते. भाजपच्या विरोधात लढत देत त्यांनी सार्वत्रिक निवडणूक जिंकली होती. खुद्द नगराध्यक्षा साक्षी प्रभू शिवसेनेत दाखल झाल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत ही आपोआप शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.नगरसेवक संख्येचे बलाबल पाहता जरी भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये असले तरी महत्वाचे नगराध्यक्ष पद मात्र युतीतील मित्रपक्ष शिवसेनेकडे राहिले आहे. तर दुसरीकडे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्याविरोधात असलेल्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात खेडेकर यांच्या अपिलाबाबत चा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे खेडेकर यांचे नगरसेवक पड अद्याप अबाधित आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रवेश दिलेल्या नगरसेवक खेडेकर यांच्या अपात्रतेबाबद्दल च्या अपिलावर काय निर्णय होणार हे औत्सुक्याचे असणार आहे.