सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे. त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलीकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी धूप होऊन किनारपट्टा विद्रूप होत आहे. वाळू वाहून जात आहे. त्यामुळे बीच नष्ट होत आहेत. या सर्व गोष्टींसाठी आचरा संगम ते देवबाग संगम या किनारपट्टीतील गावामध्ये २७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सागरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये किनारपट्टीच्या नागरिकांशी चर्चा करून प्रत्येक गावाच्या समस्यांचा अभ्यास करून विकासात्मक धोरण ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यालय पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सावंत बोलत होते. यावेळी यात्रेचे संयोजक तथा देवबाग सरपंच उल्हास तांडेल, किर्लोस कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, प्रा विलास सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ब्रिगेडियर सावंत यांनी, ही यात्रा मच्छीमारांनी आयोजित केलेली आहे. यात सर्वपक्षीय सहभागी होणार आहेत. केवळ येथील किनारपट्टीचा विकास व्हावा. होणारी धूप थांबावी. पर्यटन विकासाच्या अडचणी समजाव्यात, यासाठी मच्छीमारांची मते जाणून घेतली जाणार असल्याचे सांगितले.
