खारेपाटण (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे नुकताच मराठा समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा व गोळीबाराचा कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रविवार दि.३ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्हा मराठा महासंघ तसेच मराठा क्रांती मोर्चा कणकवली यांच्या मार्गदर्शक सुचना नंतर पुढील ध्येय धोरणे ठरविण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाचे खारेपाटण येथील कार्यकर्ते व माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी सांगितले.
जालना येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच खारेपाटण मधील व्यापारी बांधवांशी बाजारपेठ एक दिवस बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्याबाबत चर्चा करण्यात आली.मात्र सदर घटना ही निषेधार्थ असून मराठा आरक्षणाला आमचा व्यापारी वर्गाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर सद्या गौरी – गणपती सणा सुदिचे दिवस असल्याने व्यपारधंदे बंद ठेवल्यास व्यापाऱ्यांचे तसेच सर्व सामान्य जनतेचे नुकसान होऊ नये. अशी विनंती व्यापारी वर्गाकडून करण्यात आल्याने यावर सकरात्मक भूमिका घेऊन सकल मराठा समाज खारेपाटणच्या वतीने बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.












