तहसील कार्यालय कणकवली यांचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत तहसील कार्यालय कणकवली यांच्या महसूल विभागाच्या वतीने दि.२५ मार्च, २०२६ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे स.१०.०० वा. समाधान शिबिर अभियान टप्पा क्र.१ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
खारेपाटण हायस्कूल येथे होणाऱ्या या एकदिवसीय शिबिरात सर्व खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण देखील करणार आहेत. याबरोबरच नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या विविध महसुली शासकीय दाखल्यांचे वितरण देखील याच दिवशी करण्यात येणार आहे. तरी खारेपाटण मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व तलाठी सजा मधील गावातील नागरिकांनी या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे खारेपाटण मंडळ अधिकारी एस. आर. बावलेकर यांनी सांगितले आहे. तर या शिबिरात १) वर्ग २ चे वर्ग १ करणे. २) रेशन कार्ड वरची नावे की जास्त करणे. ३) सातबारातील चुका दुरुस्ती कलम १५५ प्रकरणे (७/१२) ४) ७/१२ व ८ अ वितरण करणे. ५)अँग्रीस्टॉक ६) जातीचा दाखला, नॉन किमिलेअर दाखला, वय अधिवास दाखला वितरण करणे. ७) पी एम किसान योजना लाभार्थी. ८) तुकडेबंदी शेरा कमी करणे. ९) वारसा बाबतचे प्रतिज्ञापत्र किंवा इतर विषयाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आदी सेवा सुविधा नागरिकांना देण्यात येणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खारेपाटण मंडळ अधिकारी श्रीम.बावलेकर व खारेपाटण सजा तलाठी श्री. लुडबे यांनी केले आहे.













