सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक मुणगे शाखेचे बँक मॅनेजर अविनाश कांशीराम तळवडेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी सुहास नारायण मालंडकर (रा. देवगड, पवनचक्कीजवळ), अमोल नंदकिशोर कांदळगावकर (रा. देवगड) या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा मुणगे येथे बँक मॅनेजर पदी कार्यरत असलेल्या अविनाश तळवडेकर यांचा मृतदेह 26 नोव्हेंबर 2025 रोजी देवगड तालुक्यातील आरे येथील कौल कारखान्या नजीक तळ्याच्या पाण्यात आढळला होता. तसेच तळवडेकर यांच्या मोटरसायकल च्या डिकीमध्ये त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट आढळली होती. या सुसाईड नोट मध्ये तळवडेकर यांनी आत्महत्येचे कारण नमूद केले होते. ज्यात सुहास मालंडकर आणि अमोल नंदकिशोर कांदळगावकर (रा. देवगड) या दोघांची नावे नमूद केली होती. मयत तळवडेकर यांची पत्नी सुनीता तळवडेकर हिने देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सुसाईड नोट मधील उल्लेखानुसार आरोपी सुहास मालंडकर आणि अमोल कांदळगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकेनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुहास मालंडकर, अमोल कांदळगावकर यानी जामीन मंजूर होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपी मालंडकर, कांदळगावकर याच्या जामीन अर्जाला जोरदार हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे मांडून गुन्ह्याचे गांभीर्य न्यायाल्याच्या निदर्शनास आणले. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून मयत अविनाश तळवडेकर याच्या मोबाईल सीडीआर नुसार 25 नोव्हेंबर 2026 रोजी मयत अविनाश आणि आरोपी सुहास यांच्यामध्ये सकाळी 9 वाजून 19 मिनिटे ते सायंकाळी 4 वाजून 59 मिनिट दरम्यान 9 वेळा संभाषण झाले आहे, मयत अविनाश याने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये आरोपी सुहास आणि अमोल याचे नाव आहे, मयत अविनाश याने आरोपी सुहास मालंडकर याच्या बँक खात्यात 5 लाख 39 हजार 100 रुपये ट्रान्सफर केल्याचे बँक खाते उताऱ्यावरून स्पष्ट होत आहे. तसेच आरोपी सुहास याने आणखी रक्कम मयत अविनाशकडून स्वीकारल्याचे नाकारता येत नाही, त्याबद्दल तपास करणे, मयताकडून स्वीकारलेल्या रक्कमेची आरोपी सुहास याने काय विल्हेवाट लावली अथवा कोठे गुंतवणूक केली याचा तपास करण्यासाठी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी आरोपी सुहास मालंडकर आणि अमोल कांदळगावकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आरोपी सुहास मालंडकर, अमोल कांदळगावकर याचा जेल मुक्काम वाढला असून गुढीपाडवा सणही जेलमध्ये साजरा करावा लागणार आहे.












