सावंतवाडी बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

धुळीमुळे प्रवाशी त्रस्त ; ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुखांची भेट घेत वेधल् लक्ष

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील बस स्थानक परिसरात पडलेलेल्या खड्ड्यांमुळे आणि त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तशी ही समस्या येत्या दहा दिवसात दूर करा, अन्यथा अकराव्या दिवशी आगारातून एकही एसटी बस बाहेर पडू देणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार आणि शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना दिला.तर उडणारी धुळ बसस्थानकात बसण्याच्या जागेवर साचत असल्याने विद्यार्थी तसेच प्रवाशांचे कपडे खराब होत आहेत त्यामुळे तात्काळ बसस्थाकाची साफसफाई करा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सावंतवाडी शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, विनोद ठाकूर, सतीश नार्वेकर, प्रवीण वाडकर, राजा वाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बोधे यांना सोबत घेऊन संपूर्ण बस स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांकडे त्यांनी बोधे यांचे लक्ष वेधले. तसेच या खड्ड्यामुळे दुचाकीने बस स्थानकात येणाऱ्या गाड्यांना अपघात झाले आहेत. तर एसटीलाही अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी या संदर्भात आवश्यक तो अहवाल तयार करून वरिष्ठांपर्यंत आपली मागणी पोहोचविली जाईल, असे आश्वासन श्री. बोधे यांनी उपस्थितांना दिले. तसेच बस स्थानक परिसरात बसण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. त्यामुळे प्रवाशांचे कपडे त्या धुळीत माखत आहेत. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे तात्काळ परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तर बऱ्याच एसटी बसचे चालक एक-दोन प्रवासी असल्यानंतर बस थांबवत नाहीत. अशा सर्व वाहक व चालकांना सक्त ताकीद देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान एसटी प्रशासनाचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडलेले आहे. आगारातून वेळेत एसटी बसेस सुटत नाहीत. त्याचा नाहक त्रास शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या इतर प्रवाशांनाही तासनतास ताटकळत उभे राहावे लागते, या संदर्भातही तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच डिझेल भरण्यासाठी शहरातील पेट्रोल पंप वरती जाणाऱ्या बस नियोजन करून टप्प्याटप्प्याने सोडण्यात याव्यात, या बस एकाच वेळी निघत असल्यामुळे पालिका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचाही नाहक त्रास नागरिकांनाच सोसावा लागत आहे. अशा विविध विषयांकडे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी श्री. बोधे यांचे लक्षवेधत त्यांना धारेवर धरले.

error: Content is protected !!