कासार्डेतील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
तळेरे (प्रतिनिधी) : कुस्ती खेळातील शिस्त खेळाडूंना दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरत असते,प्रत्येक खेळाडूंनी मनापासून मेहनत, कष्ट घेतल्यास तसेच जिद्दीने प्रत्येक कौशल्याचा सराव केल्यास लाल मातीतील कुस्ती कोकणातील लाल मातीत उत्तम प्रकारे रुजू शकते असा ठाम विश्वास कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. ते, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने कासार्डे हायस्कूल येथे आयोजित कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
हा उद्घाटन सोहळा कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ‘रुक्मिणी कृष्ण कुडतरकर नाट्यगृहात’ संपन्न झाला.या प्रसंगी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था समितीचे स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी रवींद्र पाताडे,प्रभाकर कुडतरकर व माजी सैनिक रवींद्र पाताडे, प्रभाकर नकाशे, मुख्याध्यापक एम.डी खाड्ये, पर्यवेक्षक एस.सी. कुचेकर, कासार्डे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, करुळ हायस्कूलचे क्रीडा निलेश फोंडेकर, व फोंडाघाट हायस्कूल क्रीडा शिक्षक अजिंक्य पोफळे,सोनु जाधव, गजानन माने व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभीऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला संजय पाताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व प्रभाकर कुडतरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांनी खेळाडुंना मार्गदर्शन करताना खाशाबा जाधव यांचा सुरुवातीपासून ते ऑलिम्पिक पर्यंतचा खडतर जीवनप्रवास कथन केला व कोकणातील लाल मातीत कुस्ती खेळ वाढण्यासाठी रुजवण्यासाठी पै.खाशाबा जाधव यांची प्रेरणा घेऊन नियमित सराव करण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले.
याप्रसंगी रवींद्र पाताडे, मुख्याध्यापक एम.डी.खाड्ये यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन कुस्ती कोच सोनू जाधव यांनी स्वागत केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले. या स्पर्धेला कणकवली तालुक्यातील विविध शाळांमधून 70 पेक्षा अधिक कुस्तीपट्टुंनी हजेरी लावली होती.या स्पर्धेतील अनेक कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या.