मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण येथे महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी गाडी पलटी होऊन अपघात

खारेपाटण ब्रीज वरील २६ वा अपघात

हायवे प्राधिकरन व प्रशासनाचे दुर्लक्ष

खारेपाटण (प्रतिनिधी): मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण शुक नदीवरील मुख्य ब्रिजवर हॉटेल मधुबन जवळील अवघड वळणावर वाहन चालकाला डायव्हर्शन नीट लक्षात न आल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी वाहन क्र.एम एच ०४ के एफ – १२५० ही गाडी पलटी होऊन अपघात झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.१५ वाजता खारेपाटण ब्रिजवर घडली. याबाबत अधिक वृत्त असे की संतोष सोनू जंगले वय – ३० वर्षे राहणार मठ बुदुक हा आपल्या मालकीची महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी गाडी मुंबई,वडाळा येथून घेऊन शासकीय समान घेऊन जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी,ओरोस येथे चालला होता.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण येथे आला असता येथील मुख्य ब्रिजवर एकच लेन सुरू असल्याने दुसरी लेन प्राधिकरणाच्या वतीने बंद करून ठेवण्यात आल्यामुळे स्टेट ब्रिजवर डायव्हर्षण मोड ठेवल्यामुळे चालकाचा ताबा सुटून गाडी पलटी झाली व अपघात झाला.सुदैवाने या अपघातात कोणीच जखमी झाले नाही.मात्र वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली. दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत धुमाळे,पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते,होमगार्ड मितेश कदम यांनी अपघातस्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी केली व पलटी झालेला चारचाकी गाडी स्थानिक ग्रामस्थ राजू चिके,महेश गुरव,राहुल गुरव,अमोल गुरव, हरीचंद्र गुरव यांच्या मदतीने व जेसीबीच्या साहय्याने सरळ करण्यास मदत केली. खारेपाटण मुख्य ब्रीज वर झालेला हा आजचा २६ वा अपघात असून आजपर्यंत कित्यके जन जखमी तर काही जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे.वारंवार प्रशासणाच्या ही बाब निदर्शनास आणून देखील जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच प्राची ईसवलकर यांनी केला आहे. तर येत्या १५ दिवसात जर खारेपाटण ब्रीज च्या दोन्हीं लेन सुरू न केल्यास तसेच तसेच ब्रिजच्या दोन्ही सुरवातीच्या बाजूना सर्व्हिस रोड न बनविल्यास खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय खारेपाटण चे साहय्यक अभियंता अतुल शिवणीवार,बी.जी. कुमावत यांनी देखील घटस्थळी भेट दिली. यावेळी ग्रमस्थानी आक्रमक भूमिका घेत त्यांना महामार्गाच्या अपूर्ण कामाविषयी जाब विचारला. तर हायवे प्राधिकरन खारेपाटण येथे भविष्यात एखादा मोठा अपघात होऊन त्यामध्ये माणसाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का ? असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. सद्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण ब्रिजवर नवीन ब्रीज ची एक लेन बंद ठेवण्यात आली असून जुना ब्रिजवरून दुसरी लेन सुरू ठेवण्यात आली आहे.मात्र ब्रीज च्या दोन्ही टोकांना अवघड वळणे असून एका बाजूला कोल्हापूर रस्ता तर दुसऱ्या बाजूला चींचवली तसेच खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता थेट हायवे ला जोडला गेला असल्यामुळे येथे सातत्याने अपघात घडत आहेत. खारेपाटण शहरातील संपूर्ण हायवे ल दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रस्ते होणे नागरी सुरक्षेच्या दृष्टीने तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी महत्वाचे असून हायवे प्राधिकरण व प्रशासनाने तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याकडे गभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!