पदवीधर मतदाराना नवीन नोंदणी करणे बंधनकारक

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. यापूर्वीची जुनी मतदार यादी पुढील काळासाठी ग्राह्य नसून सर्व पदवीधरना नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. १ नोव्हेंबर २०२० पूर्वी पदवी किंवा पदविका पूर्ण करणाऱ्या पदवीधरानी या काळात मतदार नोंदणी करावी. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

पदवीधर मतदान नोंदणीच्या या कार्यक्रमाची जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील, जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड़, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल खत्री आदी अधिकारी उपस्थित होते.

१ नोव्हेंबर २०२० पर्यंत पदवी अथवा पदविका पूर्ण केलेल्या पदवीधर नागरिकांना या मतदार यादीत आपले नाव नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये अशा पात्र नागरिकांनी आपले पदवी अथवा पदविकेचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक घेऊन जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून सत्यप्रत करून घ्यावी व मतदार नोंदणी फॉर्म भरून द्यावा. यासाठी नागरिकांनी पदविका किंवा पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, आपल्या निवडणूक मतदान ओळखपत्रावरील नोंदणी क्रमांक व आधार कार्ड ची माहिती द्यावी. पदविका प्रमाणपत्र धारकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. मात्र कोणत्या पदविका यात समाविष्ट आहेत याची यादी निवडणूक आयोगाकडून येताच ती तहसीलदार कार्यालयात उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.

यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४५० पुरुष, व १८५८ महिला असे एकूण ५३०८ पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झालेल मतदार होते. ही यादी आता रद्दबातल झाली असून सर्व पदवीधर मतदारांना या काळात नव्याने मतदान नोंदणी करणे बंधनकारक आहे. ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पदवीधर मतदारांना मतदार नोंदणी करण्यास संधी असून याबाबतची प्रसिद्धी पुन्हा १६ ऑक्टोंबर व २६ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. त्यामुळे सर्व पात्र पदवीधरानी आपले मतदार नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांनी केले आहे.

यापूर्वी ज्या पदवीधर मतदारांनी मतदान केले होते त्या सर्व मतदारना नव्याने मतदार नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून मतदानाचा लाभ घ्यावा असेही यावेळी किशोर तावड़े यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!