दुचाकीस्वार सुदैवाने वाचला. वीज वितरणचे मोठे नुकसान
धामापूर भावई मंदिर नजिक दुर्घटना
भरधाव आणि अवैध वाहतूकीवर नियंत्रण कधी आणणार ? स्थानिकांचा पोलीस प्रशासनाला सवाल
चौके (अमोल गोसावी) : आज शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान मालवण- धामापूर – कुडाळ या मार्गावर चौके येथून कुडाळच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा ट्रक क्र. MH- 14 CP – 8787 या भरधाव ट्रकने धामापूर भावई मंदिर नजीक रस्त्याकडेला असलेल्या विद्युत पोलला जोरदार धडक दिली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात विद्युत पोलचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि विद्युततारा तुटून रस्त्यावर पडल्या. आणि या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती . दरम्यान याच वेळी समोरून येणारा एक दुचाकीस्वार पडलेल्या वीज तारांमध्ये अडकून पडला आणि त्यालाही अपघात झाला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु या अपघातात वीज वितरणचे मोठे नुकसान होऊन रस्त्याकडेला असलेल्या दगडी कुंपणाचे नुकसान झाले. तसेच परिसरातील वीजपुरवठा दिवसभर खंडीत झाला होता.
धामापूर येथे आज पुन्हा झालेल्या या अपघातानंतर पुन्हा एकदा यामार्गावरुन चिरे आणि अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर आणि ट्रक चालक बेदरकार पणे वाहने चालवत असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे आज ज्याठिकाणी ट्रकने विद्युत पोलला धडक दिली याच ठिकाणी यापूर्वी तीन ते चार वेळा अशाच प्रकारे डंपर अथवा ट्रकने ठोकरल्याने अपघात घडून वीज पोल तुटल्याचे दुर्घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी सांगितले. आणि धामापूर ते नेरुरपार दरम्यान वारंवार अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या अवैध वाळु आणि चिरे वाहतूक करणारे डंपर व भले मोठे ट्रक यांच्या भरधाव वेगावर आणि अवैध वाहतूकीवर पोलिस आणि महसूल प्रशासन कारवाई करून नियंत्रण कधी आणणार असा सवाल यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केला.