ब्युरो न्युज : वनडे वर्ल्ड कपमधील सर्वात महत्त्वाच्या अशा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाला 200 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतीय फिरकीपटूंची जादू पहायला मिळाली. टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर कांगारूंनी लोटांगण घातलं. रविंद्र जडेजा आर आश्विन अन् कुलदीप यादव यांनी ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर टेकवलं आहे. जडेजाने 10 ओव्हरमध्ये 28 धावा देत 3 गडी बाद केले. तर प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळाली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्श याला आऊट केलं. विराट कोहलीने स्लीपमध्ये भन्नाट कॅच घेतला अन् वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक कॅचेस घेणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चिवट झुंज दिली. मात्र, कुपदीप यादवने वॉर्नरला तंबुत धाडलं. त्यानंतर रविंद्र जडेजाने सुत्र हातात घेतली अन् 9 बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन मुख्य फलंदाज बाद केले. स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि मार्नस लॅबुशेन यांना जड्डूने झटपट बाद केलं अन् ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकलं. 110 धावांवर 2 गडी बाद अशी धावसंख्या असलेला ऑस्ट्रेलिया संघ 140 वर 7 आऊट, अशा परिस्थिती सापडला. त्यानंतर त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. मिशेच स्टार्क अन् पॅट कमिन्सच्या सावध खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 199 धावाच करता आल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात ऑलआऊट केलंय.