वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 46 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर….

यावर्षीपासून खुल्या गटात घेतली जाणार प्राथमिक फेरी

कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेने सन 1978 पासून प्रवासाला सुरुवात केली, सर्वोत्तमतेचा ध्यास घेत वेगळेपणाची कास धरत गेली 46 वर्ष न थांबता अविरतपणे ही चळवळ चालू ठेवली आहे. स्पर्धेचे यंदाचे हे 46 वे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी काही मोजक्या स्पर्धेतील ही स्पर्धा असून गेली तीन-चार वर्ष खुल्या गटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता यावर्षीपासून संस्थेने खुला गटाची स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेण्याचे निश्चित केले आहे. संस्थेच्या या निर्णयामुळे कणकवलीतील जाणकार रसिक प्रेक्षकांना सर्वोत्तम प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शालेय व खुल्या असे दोन गटांमध्ये घेण्यात येणारी ही एकमेव स्पर्धा असून खुल्या गटाची प्राथमिक फेरी 25 नोव्हेंबर रोजी पुणे, 26 नोव्हेंबर रोजी मुंबई, 27 नोव्हेंबर रोजी कणकवली, तर 2 डिसेंबर रोजी गोवा अशा चार केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील खुल्या गटासाठी प्रवेश फी रुपये 2000/- व अनामत रक्कम रुपये 3000/- मिळून रुपये 5000/- व पूर्ण भरलेला प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर संघांचा स्पर्धेतील प्रवेश निश्चित करण्यात येईल. स्पर्धेतील प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2023 अशी असून शालेय गटासाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 तर शालेय गटासाठी प्रवेश फी रुपये 1000 भरणे आवश्यक असेल. स्पर्धेची प्रवेश फी QR CODE द्वारे अदा करण्यात यावी. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह श्री.शरद सावंत यांच्या

9422584054 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा तसेच या चळवळीने उद्दिष्ट पूर्तेकडे वाटचाल करावी यासाठी जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग या स्पर्धेच्या खुल्या व शालेय गटामध्ये नोंदवून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. एन. आर. देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!