श्रीधर नाईक चौक (नरडवे नाका) येथील प्रवासी निवारा शेड कोसळली, प्रवाशांची गैरसोय

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक (नरडवे नाका) या ठिकाणी असणारी प्रवासी निवारा शेड परतीच्या पावसाच्या तडाख्याने उदमळून कोसळली.त्यामुळे प्रवाशांची फार गैरसोय होत आहे.याबाबत स्थानिक प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रवासी निवारा शेड तातडीने उभारण्याची मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.

कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक या ठिकाणी प्रवाश्यांच्या सोईसाठी असणारी प्रवासी निवारा शेड परतीच्या पावसात उदमळून पडली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर नवीन शेड उभी करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत अशी भावना सर्व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कणकवली – कनेडी या मार्गावरती असणाऱ्या शहरातील सर्वच शेडची अवस्था ही दयनीय झाली आहे.त्यामुळे वृध्द व्यक्ती,शालेय विद्यार्थी व अन्य प्रवासी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.श्रीधर नाईक चौका नजिकची शेड कोसळून पडली त्यावेळी सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही म्हणून मोठा अनर्थ टळला.एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदर प्रशासनाने याबाबत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.स्थानिक प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेऊन सदरची प्रवासी निवारा शेड नव्याने उभारावी तसेच शहरात अन्य ठिकाणच्या मोडकळीस आलेल्या सर्व प्रवाशी निवारा शेडची देखील पाहणी करून दुरुस्ती करण्यात यावी अशी आग्रही मागणी संतोष नाईक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!