सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : सख्य्या भावाला ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या सीताराम आत्माराम पुजारे ( वय 39, रा. सरंबळ, कुडाळ ) याचा जामीन अर्ज प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. संजय भारुका यांनी नामंजूर केला.सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी सीताराम पुजारे याने आपला skkha भाऊ सत्यवान आत्माराम पुजारे याच्यावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 रोजी कुडाळ तालुक्यात सरंबळ पुजारेवाडी येथे घडली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सीताराम ने जामीन साठी अर्ज सादर केला होता.त्याला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपी सीताराम हा सराईत गुन्हेगार असून याआधी त्याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, आरोपी ने प्रॉपर्टी च्या वादातून भाऊ सत्यवान वर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला असून घटनास्थळवरून रक्ताने माखलेला कोयता जप्त करण्यात आला आहे, आरोपी प्रॉपर्टी च्या वादातून आई वडील भाऊ यांच्या जीविताला धोका पोचवू शकतो, आरोपी आडदांड अविचारी वृत्तीचा असून जामीन मिळाल्यास पुन्हा फिर्यादी च्या जीवाला धोका पोचवू शकतो,गावातील अन्य साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. गावात भीतीचे वातावरण असून अन्य साक्षीदारांकडे अद्याप तपास करणे बाकी आहे.सरकारी वकील देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. भारुका यांनी आरोपी सीताराम पुजारे चा जामीन फेटाळला.











