मंगेश लोकेंचा २६ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणाचा चा इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डाॕक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची पदे भरुन रुग्णालयात होणारी रुग्णांची गैरसोय दूर करावी. अन्यथा २६ आक्टोबर २०२३ रोजी तालुक्यातील जनतेसह रुग्णालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी जिल्हा चिकित्सक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील वैदयकीय अधिक्षक,औषध निर्माता व क्लार्क ही पदे कायमस्वरुपी भरण्यात यावीत. सर्व सोईसुविधांयुक्त प्रसुतीगृह तयार करुन स्ञी रोग तज्ञ डाॕक्टरांची नेमणूक करावी. रुग्णालयात पाणी व स्वच्छता ठेवण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. वैभववाडी तालुका हा दुर्गम तालुका आहे. वैभववाडी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आहे. माञ आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोग्य यंञणा पूर्णपणे ढासळली आहे. गेले दोन महिने तालुक्यात साथीचे आजार चालु आहेत. डेंग्यु, मलेरिया, टायफाॕड सारखे आजाराचे रुग्ण वाढले आहेत. परंतु ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व डाॕक्टरांची रिक्त पदामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबतीत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छता कर्मचारी असूनही नसल्या सारखे आहेत. पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे स्वच्छता होत नाही. याचा ञास रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे वैदयकिय अधिक्षक पदही गेले काही वर्षे रिक्त आहे. सिनिअर क्लर्कची जागा रिक्त आहे. हजर असलेल्या डाॕक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना सहा सहा महीने पगार मिळत नाही. त्यामुळे हजर असलेले डाॕक्टरही वैतागले असून काम सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे सुध्दा उपलब्ध नसतात. दोन महिण्यापूर्वी शासनाने मोठा गाजावाजा करुन राज्यातील सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार मिळणार असे जाहीर केले आहे. ते फक्त जाहीराती पुरतेच आहे का असे प्रश्न तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना पडत आहेत. माञ स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंञी व प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे २६ आक्टोबर रोजी तालुक्यातील जनतेसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा लोके यांनी दिला आहे.











