आरो॔दा गोसावी मठ येथे नाथ गुरूमेळावा संपन्न

चौके ( अमोल गोसावी ) :आरोंदा येथे रविवार दि. ५ नोव्हेंबर गोवा व सिंधुदुर्ग परिसरातील नाथपंथी गोसावी समाजाचा गुरूमेळावा संपन्न झाला. यावेळी या परिसरातील एकूण १० मठातील गोसावी गुरूज्ञातक व शिष्यपरिवार उपस्थित होते. गोसावी समाजाचे मठ व समाज एकत्र कसा जोडला जाईल? या समाजाची उन्नती कशी होईल? समाजातील विधीवत कार्ये कशी आहेत? गुरूच्या अधिक्षेत्रात हे मठ कसे राहतील याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सिद्धमहापुरष नाथपंथी योगमार्ग, भ॔डारा उत्सव, घटस्थापना, पतीर, रूजवाण, कानचिरे, दिक्षा, रितिरिवाज, सोयरसुतक, अंत्यविधी व मर्तिक कार्य याविषयी मुलभूत माहीती देणेत आली. समाजात सध्या असलेले विवाह प्रश्न कसे सोडवावेत यावरही चर्चा करणेत आली. गोवा परिसरातील गोसावी मठ, नापंथीयांची भुमिका, गुरूमहात्म्य यावर मार्गदर्शन करणेत आले. मठ कसे बांधावेत ? मठाची देखभाल कशी करावी? याविषयी चर्चा करण्यात आली. आरोंदा येथील ही तिसरी बैठक/मेळावा गोसावी समाजाचे गाव-हाटीतील महत्व सांगणारी होती. मठ परंपरा ही गाव आणि तिथल्या स्थानिक देवतांशी कशी जोडलेली आहेत याविषयी माहीती देण्यात आली. ती महत्त्वपूर्ण होती.

कोकणात अनेक मठ आहेत. त्याची देखभाल, पूजापाठ गोसावी समाजाचे लोक करतात. मठात वर्षातून एकदा भंडारा उत्सव होतो. अनेक कार्यक्रमही होतात. सध्या गोसावी समाजातील लोक चांगल्या नोकरीवर, अधिकारी पदावर आहेत. पण काहीजण या मठ परंपरेपासून अनभिज्ञ व दूर आहेत. काही मठही दुर्मीळ डोंगर द-यात आहेत. त्यांचा इतिहासही कोणाला माहीत नाही. गोसावी समाजाच्या मठांची माहीती संकलित करून पुस्तकरुपी ती लोकांना द्यावी असाही विचार करणेत आला. जे मठ शहरापासून दूर खेड्यातील दुर्गम भागात आहेत आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची माहीती सर्वाना द्यावी तसेच काही बुवाना मांडविधी, मंत्रतंत्र याविषयी भरपूर माहीती आहे. ते मंत्र व विधी परंपरा माहीती संकलित करावी, असेही ठरविण्यात आले. जे लोक दुर्गम भागात आहेत, समाजाच्या वरच्या सधन थरात नाहीत. त्यांची दखल व त्यांचेकडुन माहीती घेणे गरजेचे आहे. असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

काही गावचे मठ विकसित झालेत पण स्थानिक पातळीवर प्रश्नही निर्माण झालेत. राजकारणाचा बदल म्हणा किंवा शिक्षणाचा प्रसार म्हणा माणसे स्वार्थी बनलीत. त्यामुळे प्रत्येक मठात मेळावे घेणे व लोकजागृती करणे आज गरज बनले आहे. मठातील पूजेचा मान, वरसल, एकावळी, सोयरसुतक, पाणी देणे, विधीवत कार्य करणे, देवपाण करणे अशा अनेक गोष्टीवर साधक बाधक चर्चा करणेत आली. समाजात जाणकार बुवा म्हणून काहीना मान दिला जातो. समाजाचा कार्यकर्ता, मंडळाचा पुढारी यापेक्षा बुवा यांना मान अधिक असावा. मठात प्रतिवर्षी भंडार, दसरा यासारखे मोठे उत्सव होतात. लोकवर्गणी गोळा होते. व्यवहार येतात. वाद, भांडणे होतात. यातून समाजाची हानी होते.

गुरूचे कार्य व महत्व कमी होवू नये यासाठी समाजाने गुरूला मान द्यावा असे सुचविण्यात आले. पुर्वी मठात व इतर गावात गुरूना मान होता. तो परत मिळावा यासाठी मठ संस्कृती व गोसावी परंपरा जोपासली पाहीजे. आजही आपल्या मठात विधी व वार्षिक पूजापाठ करणारे काही लोक आहेत त्यांचा आदर करून त्याना वंदन करून गुरूचे महत्व वाढविणे आणि समाजाला उभारी देणे ही खरी काळाची गरज आहे. अजुनही गावातले मठ देवस्थानाच्या कक्षेत आहेत. देवस्थान जमीनी व वतने आहेत, मठ, मंदिराची सेवाचाकरी करून गुजराण केली जात आहे, गुरूदिक्षा देण्याच्या पध्दती आहेत. गोसावी समाजाचे मठ संस्कृती, परंपरा टिकविणे हे आज गरजेचे आहे. नाथगोसावी हे जीवनमार्ग दाखविणारे ज्ञानगुरू आहेत हे लोकांना पटले पाहिजे. यासाठी आपली संस्कृती परंपरा व सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. गोसावी समाजाची संस्कृती आणि मठ परंपरा यावर विचार मांडणारा हा गुरूमेळावा खूपच प्रेणादायी व मौलिक मार्गदर्शन करणारा ठरला या नाथगूरू मेळाव्यासाठी श्री. भिवनाथ गोसावी, आरोंदा श्री. सिद्धेश गोसावी, दशरथ गोसावी, सावळाराम गोसावी, रेडी श्री युवराज गोसावी, मांजरे तसेच प्रा. भाऊसाहेब गोसावी व प्रवीण गोसावी, सावंतवाडी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!